पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा
टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन

– पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन लाईन टाकण्याबाबत कार्यवाही
चऱ्होली | प्रतिनिधी
चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना विभागाचे प्रमुख श्री. बन्सल यांच्यासोबत सविस्तर बैठक घेऊन प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, प्रलंबित विकासकामे तसेच आवश्यक मूलभूत सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेची टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री. बन्सल यांनी दिले.
दरम्यान, गृहप्रकल्पातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत परिसरातील पाणीपुरवठा, पाण्याचा दाब आणि उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण याबाबत प्रत्यक्ष परिस्थिती तपासण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस पाणीपुरवठ्याचे रीडिंग घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – ५८ लाख कुणबी नोंदींपैकी १५ ते २० लाख नोंदी कमी होणार?; बबनराव तायवाडेंचा दावा
या पाहणीत पाण्याचा दाब किंवा पाणीपुरवठा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा लाईन टाकून नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता श्री. भोसले यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच प्रलंबित कामांना गती मिळावी, यासाठी संबंधित महापालिका विभागांशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांच्या न्याय्य मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
पाणीपुरवठा, प्रलंबित विकासकामे आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न लवकरात लवकर सुटल्यास पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित कामांना गती देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात सोडवाव्यात, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या गृहप्रकल्पातील अनेक सदनिकांमध्ये गळतीची समस्या असून, बांधकामाच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच नागरिकांना आश्वासन देण्यात आलेल्या अमेनिटी व इतर आवश्यक सोयी-सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, या गृहप्रकल्पातील रहिवाशांना पाण्यासारखी मूलभूत सुविधा देण्यातही महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. महापालिकेने या गृहप्रकल्पातील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रहिवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रशासनाकडून या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही आणि कामे पूर्ण करण्यात आली नाहीत, तर पंतप्रधान आवास योजनेतील सर्व सभासदांना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.”
— संजीवन सांगळे, अध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन





