आशिया चषकावर भारताचे निर्विवाद वर्चस्व! फायनलमध्ये श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा

Asia Cup Final | जागतिक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई उपखंडातही आपले अव्वल स्थान सिद्ध करत महिला आशिया चषक २०२६ च्या जेतेपदावर दिमाखात नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा उडवत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषकावर कब्जा केला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची १२९ धावांची वादळी सलामी या ऐतिहासिक विजयाचा पाया ठरली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी दुबईच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. शफाली वर्माने अवघ्या ३९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची आक्रमक खेळी केली, तर स्मृती मानधनाने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५९ धावा ठोकल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी रचलेल्या १२९ धावांच्या भागीदारीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (१४), ऋचा घोष (१७) आणि कमालिनी (१५) यांनी उपयुक्त योगदान दिल्याने भारताने निर्धारित षटकांत १८३ धावांचा डोंगर उभा केला.
१८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळती झाली. चामरी अट्टापटू आणि विश्मी गुणरत्ने यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु दीप्ती शर्माने एकाच षटकात या दोघींना बाद करत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. त्यानंतर श्री चरणीने घातक गोलंदाजी करत केवळ २० धावांत ४ बळी टिपले आणि श्रीलंकेच्या मधल्या फळीचा पाडाव केला. दीप्ती शर्माने ३ गडी बाद करत तिला उत्तम साथ दिली. ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे श्रीलंकेचा डाव १११ धावांवर आटोपला आणि भारताने ७२ धावांनी शानदार विजय नोंदवला.
हेही वाचा
गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना शुभेच्छा; ‘गणपती बाप्पा मोरया!’
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦 🏆
A flawless campaign capped by sheer brilliance 🇮🇳🥳
Congratulations to #TeamIndia on winning the #WomensAsiaCup 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/knKLXGSfOd #INDvSL pic.twitter.com/O3KaZ0oA3p
— BCCI Women (@BCCIWomen) September 13, 2026
या संपूर्ण स्पर्धेत शफाली वर्माने सर्वाधिक २३६ तर स्मृती मानधनाने २१३ धावा चोपून भारताच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली. यापूर्वी भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२, २०१६ आणि २०२२ मध्ये हा चषक जिंकला होता. या ऐतिहासिक जेतेपदानंतर भारतीय महिला संघ आता पूर्ण आत्मविश्वासाने जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरणार आहे.
भारतीय संघाची जेतेपदापर्यंतची विजयी वाटचाल:
- विरुद्ध थायलंड: ९४ धावांनी विजयी
- विरुद्ध हाँगकाँग: १३७ धावांनी विजयी
- विरुद्ध पाकिस्तान: ७ विकेट्सनी विजयी
- विरुद्ध बांगलादेश (उपांत्य फेरी): ४० धावांनी विजयी
- विरुद्ध श्रीलंका (अंतिम फेरी): ७२ धावांनी विजयी




