Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पाषाण रस्त्यावर भीषण अपघात! १९ वर्षीय तरुणाच्या भरधाव कारच्या धडकेत आयटी इंजिनिअरचा अंत

पुणे | कल्याणीनगर आणि नवले पूल अपघातांच्या घटना ताज्या असतानाच, पुण्यातून आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी पाषाण रस्त्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय आयटी इंजिनिअर वीरेंद्र द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी कारचालक १९ वर्षीय ईशान विशाल शेठिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याला अटक न करता केवळ नोटीस बजावून सोडल्याने मृताच्या नातेवाईक आणि मित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वीरेंद्र द्विवेदी हे हिंजवडीतील ‘विप्रो’ कंपनीत वरिष्ठ आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ते एनडीए बाजूकडून पाषाणच्या दिशेने मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. पाषाण येथील हनुमान मंदिराजवळील नेकलेस गार्डनजवळ पोहोचले असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेत वीरेंद्र रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. ईशान आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा

दुष्काळी परिस्थितीबाबत तात्काळ अहवाल सादर करा; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नोटीस देऊन सोडल्याने मित्रांचा तीव्र आक्षेप

कारचालक ईशान शेठिया हा पुणे-मुंबई महामार्गावरील ऑक्सफर्ड महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्याचे वडील एका नामांकित खासगी कंपनीत उच्च पदावर आहेत. घटनेच्या वेळी तो महाविद्यालयातून घरी परतत होता. अपघातानंतर वीरेंद्र यांचा भाऊ धीरेंद्र द्विवेदी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, अपघातानंतर चालक पळून गेला नाही आणि त्याने स्वतः जखमीला रुग्णालयात दाखल केले, या कारणास्तव पोलिसांनी त्याला तात्काळ अटक न करता नोटीस बजावली. मात्र, एका व्यक्तीचा जीव घेणाऱ्या चालकाला अशा प्रकारे सोडून दिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असा आक्षेप घेत वीरेंद्र यांच्या मित्रांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button