पनवेलमध्ये मतदारयादी पुनरीक्षणाच्या गोपनीय प्रपत्रांची झेरॉक्स!
निवडणूक आयोगाच्या संवेदनशील कागदपत्रांचा अनधिकृत वापर; एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, सखोल चौकशीचे आदेश

रायगड : १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत वापरण्यात येणारी निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वाची व गोपनीय गणना प्रपत्रे (Enumeration Forms) अनधिकृतपणे ताब्यात ठेवून त्यांची झेरॉक्स काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणना प्रपत्रांची अनधिकृतपणे झेरॉक्स काढली जात असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली होती.
झेरॉक्स सेंटरमध्ये ३,४०० गणना प्रपत्रे आढळली
तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित झेरॉक्स सेंटरवर धाव घेत प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी मुर्बी गाव, खारघर येथील रहिवासी सूरज पाटील हे सदर प्रपत्रांची झेरॉक्स काढत असल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान घटनास्थळी तब्बल ३,४०० गणना प्रपत्रे आढळून आली. ही प्रपत्रे एकूण ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे समोर आले. त्यापैकी पाच मतदान केंद्रांची १०० पेक्षा अधिक प्रपत्रे होती, तर उर्वरित सहा मतदान केंद्रांचे प्रत्येकी एक प्रपत्र आढळून आले.
अनधिकृतरीत्या प्रपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा
निवडणूक नियमांनुसार संवेदनशील गणना प्रपत्रे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणे अपेक्षित आहे. अशी कागदपत्रे अनधिकृतपणे ताब्यात ठेवणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे नियमांचे उल्लंघन असल्याने सूरज पाटील यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०४०९/२६ अन्वये भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – अमराळे गावाला मिळणार मुख्य रस्त्याची थेट जोडणी; ७ कोटी २० लाखांच्या पुलाचे भूमिपूजन
पाच BLOंवर कारवाई
ज्या पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या दप्तरातून ही अतिरिक्त प्रपत्रे बाहेर गेल्याचे समोर आले, त्या BLOंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्तांना भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३२ अन्वये संबंधित पाचही BLOंना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सखोल चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी क्रमांक ३ नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असून, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे अनधिकृतपणे बाहेर कशी गेली, याचीही चौकशी केली जात आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या कारवाईची माहिती दिली.





