“गोरक्षेचा मुद्दा भारतात प्रत्येक धर्माने स्वीकारला आहे”; ब्रिटनमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

Mohan Bhagwat | भारतात गोरक्षा ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून, ती प्रत्येक धर्माने स्वीकारली आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ब्रिटनमध्ये ‘हिंदू स्वयंसेवक संघ UK’ आणि ‘इंटीग्रल’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ कार्यक्रमात ते अनिवासी हिंदूंना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पंच परिवर्तनाचे सूत्र मांडत, समाजपरिवर्तन आणि हिंदू राष्ट्र संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले.
पंच परिवर्तनाचे महत्त्व सांगताना मोहन भागवत म्हणाले की, धोरणे जेव्हा बदलायची तेव्हा बदलतील, पण आधी आपण स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. पाणी वाचवणे, प्लॅस्टिकमुक्ती आणि वृक्षारोपण यांसारख्या कामांची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. काही मुद्दे राजकारणापलीकडचे असतात आणि त्यावर समाजात ऐक्य असते. ग्रामीण विकास आणि गोरक्षेसारख्या मुद्द्यांना कोणीही विरोध दर्शवलेला नाही; किंबहुना भारतात गोरक्षा ही प्रत्येक धर्माने स्वीकारली आहे. राजकारणापासून दूर ठेवल्यास लोक अशा सामाजिक कामांत स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
हेही वाचा
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आता ‘रिपोर्ट कार्ड’; तीन वर्षांच्या कामगिरीवर श्रेणी निश्चित
“मुस्लिम नको म्हणणारा हिंदू असूच शकत नाही”
हिंदू राष्ट्र या संकल्पनेचा सविस्तर उलगडा करताना भागवत म्हणाले की, विविधता असणे स्वाभाविक असले तरी ऐक्य हेच भारताचे अंतिम सत्य आहे. “जर एखादा हिंदू असा विचार करत असेल की भारतात मुस्लिम नसायलाच हवेत, तर त्याला हिंदू म्हणताच येणार नाही. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असले तरी माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि प्रत्येकाचे अंतिम ध्येय एकच आहे. हिंदू हा शब्द केवळ पूजापद्धतीशी किंवा संकुचित धर्माशी निगडीत नसून, तो आस्तिक, नास्तिक आणि विविध विचारधारांना सामावून घेणारा विचार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.




