विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘विकसित महाराष्ट्र 2047’च्या वाटचालीत सर्वसमावेशक विकासावर भर; राज्यातील ४५० हून अधिक शाळांमधील २१ हजारांहून अधिक विद्यार्थी अभियानाशी जोडले

मुंबई : सर्वसमावेशक विकास हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असून, समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक आहे. ‘दिशा’ अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात असून, या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सहसंस्थापक अमित चंद्र, जय वकील फाऊंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डॉ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एचटी पारेख फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माणिक गुरसळ, आयुक्त सत्यजित बडे, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थानचे संचालक राम कुमार, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांच्यासह राज्यभरातील विशेष शिक्षक ऑनलाइन उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या गुणांवर न होता, त्यांच्या आत्मविश्वासावर आणि समाजात समरस होण्याच्या क्षमतेवरही झाले पाहिजे. सर्व शाळांमध्ये ‘दिशा’ अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ४५० हून अधिक शाळा, २७०० हून अधिक शिक्षक आणि २१ हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत.
विशेष मुलांना वैज्ञानिक आणि आधुनिक अध्यापन तंत्राच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री ‘दिशा’ अभियानामुळे उपलब्ध झाली आहे. विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी असून, या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
हेही वाचा – ग्रामीण महिलांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे; शिवराज सिंह चौहान
सर्व विशेष शिक्षकांचा होणार सन्मान
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच विशेष शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये समारंभपूर्वक सर्व विशेष शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
‘दिशा’ अभियान हा शासनाच्या प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा उपक्रम असून, त्याच्या प्रगतीचा आणि अडचणींचा ‘वॉर रूम’मधून नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रत्येक विशेष मुलापर्यंत आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत ‘दिशा’ अभियानाची उपयुक्त छापील वर्कबुक्स पोहोचवण्यात येतील.
नियमित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बौद्धिक अक्षमता असलेल्या बालकांसाठी नियमित शिक्षकांच्या प्रशिक्षणात या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आणि जय वकील फाऊंडेशन संयुक्तपणे प्रयत्न करतील. तसेच बालकांमधील विशेष गरजांची वेळीच ओळख व्हावी यासाठी विशेष ‘प्रशिक्षण मॉड्यूल’ विकसित करण्यात येणार असून, यासाठी जय वकील फाऊंडेशनने पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक ठरेल
राज्य शासनासोबतच समाज आणि सेवाभावी संस्थांच्या एकत्रित सहभागामुळे या क्षेत्रात मोठे काम उभे राहिले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्र दिव्यांग शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
जय वकील फाउंडेशन, बजाज फिनसर्व्ह, एचटी पारेख फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांनी या संवेदनशील विषयात घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.
पाच विशेष शिक्षकांचा गौरव
बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी भारतातील पहिला प्रमाणित आणि एकसमान अभ्यासक्रम असलेल्या ‘दिशा अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल यामिनी काळे (नवजीवन मतीमंद मुलांची शाळा, छत्रपती संभाजीनगर), अण्णासाहेब कदम (पांडुरंग निवास मतीमंद विद्यालय, लातूर), वैशाली गायकवाड (नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नागपूर), ज्ञानेश्वर काळे (कै. रावसाहेब निवासी मतीमंद विद्यालय, देवळी, वर्धा) आणि मानसी मुलाम (जय वकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड ऑफ स्पेशल केअर, मुंबई शहर) या पाच विशेष शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी प्रास्ताविकातून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अर्चना चंद्र यांनी जय वकील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘दिशा’ अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.




