Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सरकारी रुग्णालयांच्या आरोग्यसेवांना आता ‘स्टार रेटिंग’; गुणवत्तेत तडजोड आढळल्यास कडक कारवाई : मंत्री प्रकाश आबिटकर

बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिससह विविध सेवांचे नियमित मूल्यांकन करण्याचे निर्देश

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आणि बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंग प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आरोग्यसेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाह्यस्रोतांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा (एचएलएल) सेवा, रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सीटी स्कॅन, एमआरआय, उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार पुरवठा, स्वच्छता आणि तांत्रिक सहाय्य आदी सेवांचा समावेश होता.

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे ही सार्वजनिक आरोग्य विभागाची प्राथमिकता आहे. त्यामुळे बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण आणि मूल्यांकन करण्यात यावे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेवांची नियमित तपासणी करून गुणवत्तेचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आबिटकर यांनी दिले.

विविध निकषांवर रुग्णालयांचे मूल्यांकन

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत विशेष वैद्यकीय सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती आणि शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर तसेच रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

हेही वाचा –  विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला बचतगटांकडून आहार पुरवठ्यावर भर

राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये महिला बचतगटांच्या माध्यमातून सकस आणि आरोग्यदायी आहाराचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदारांच्या सहभागाने आरोग्य समितीच्या बैठका घेण्यात याव्यात. या बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा अहवाल तयार करावा, असे निर्देशही देण्यात आले.

नोव्हेंबरमध्ये जनआरोग्य समितीची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील सर्व जनआरोग्य समित्या प्रभावीपणे कार्यान्वित असाव्यात, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य डॅशबोर्डचा लोकहितासाठी वापर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी प्रभावी वापर करावा. नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे शासनाचे धोरण असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, रुग्णालय-आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षक सहभागी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button