ग्रामीण महिलांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे; शिवराज सिंह चौहान
६ कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचे राष्ट्रीय लक्ष्य; कर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करून बँकांनी महिला बचतगटांना सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचतगटांना केवळ शासकीय योजनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने आणि सर्वोत्कृष्ट योगदान देऊन काम करावे, असे आवाहन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.
मुंबईतील हॉटेल हयात येथे आयोजित ‘स्वयं सहाय्यता गट-बँक संलग्नता’ या राष्ट्रीय आढावा बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव रोहित कंसल आणि महाराष्ट्र ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह देशभरातील वरिष्ठ अधिकारी आणि बँक व्यवस्थापक उपस्थित होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ६ कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रशासनाने महिलांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून ‘मिशन मोड’वर काम करणे आवश्यक आहे. देशात तीन कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचा टप्पा गाठला आहे. आता सहा कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वर्षाला ३० ते ५० हजार रुपये उत्पन्न असलेल्या तळागाळातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर द्यावा लागेल.
अनेकदा संपन्न भागांमध्ये बँका सहजपणे कर्जवाटप करतात. मात्र, जिथे खरी गरिबी आहे, तिथे बँकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे चौहान यांनी स्पष्ट केले. ग्रामीण महिलांना बँकिंग प्रक्रियेत सर्वाधिक अडचणी येतात. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि संवेदनशीलता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकींना काही खासगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही आल्याचे त्यांनी सांगितले. खासगी बँकांच्या या उदासीनतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत, महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व बँकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा – महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 4 सप्टेंबरला कोकण-गोव्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, अनेक बँकांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा दीड ते दोन पट कामगिरी केल्याबद्दल चौहान यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुढील काळात दर तीन महिन्यांनी व्हर्च्युअल, तर दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बचतगटातील महिलांच्या अडचणींचे निराकरण आणि ठरवून दिलेली उद्दिष्टे पूर्ण होत आहेत की नाही, याचा मासिक, तिमाही आणि सहामाही पातळीवर आढावा घेण्यात येणार आहे.
कर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याचे निर्देश
बैठकीच्या सकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्र्यांनी महिला बचतगटांच्या प्रतिनिधी तसेच राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (SRLM) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे आणि उत्तर प्रदेशातील प्रतिनिधींनी कर्ज मंजुरीतील अडथळ्यांचा मुद्दा मांडला. त्याची गंभीर दखल घेत आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून बँकिंग प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले.
कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस धोरण तयार करण्याबरोबरच ‘जनसमर्थ पोर्टल’वरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले. कर्ज मिळवताना डिजिटल प्रणाली अडथळा ठरू नये, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. लडाखसारख्या दुर्गम भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
उमेद आणि डीएनवाय-एनआरएलएममधील महिलांना बँकिंग प्रक्रिया, विविध योजनांची माहिती आणि तक्रार निवारणासाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन मिळावे, यासाठी लवकरच विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम आणि उत्तराखंडसह विविध राज्यांतील महिलांनी आपल्या अडचणी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या.
महाराष्ट्रात एक कोटी ‘लखपती दीदी’चे लक्ष्य
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, देशातील सहा कोटी ‘लखपती दीदी’च्या उद्दिष्टात महाराष्ट्रात सध्या सुमारे ५० लाख लखपती दीदी आहेत. राज्य शासनाने महाराष्ट्रात एक कोटी लखपती दीदी घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
राज्यात सध्या ६ लाख ७२ हजार बचत गट आणि ३४ हजार ८८५ ग्रामसंघ कार्यरत आहेत. नवीन बचतगट स्थापन करणे आणि त्यांची बँक खाती उघडण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात आहे. बचतगटांचा कर्ज परतफेडीचा इतिहास चांगला असून एनपीए अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिला उद्योजकतेला बळ देण्यासाठी बँकांनी कर्ज प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करावी, असे आवाहन गोरे यांनी केले.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी आदिवासीबहुल भागांमध्ये विशेष लक्ष देण्याबरोबरच महिलांचे डिजिटल व्यवहार वाढवणे आणि ‘लखपती दीदी’चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महिलांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव अमित शुक्ला यांनी ‘दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’अंतर्गत ‘आर्थिक समावेशन २.०’, ‘बीसी सखी’ आणि वित्तीय साक्षरता याबाबतचा कृती आराखडा सादर केला. ग्रामीण महिलांच्या बचतगटांचे यशस्वी वैयक्तिक उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी सुलभ आणि जलद कर्जपुरवठा करण्यावर बैठकीत एकमत झाले.
या राष्ट्रीय परिषदेत स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांसह १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आयसीआयसीआय, एचडीएफसीसह चार खासगी बँका, ११ प्रादेशिक ग्रामीण बँकांचे अध्यक्ष, विविध राज्यांच्या सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच आरबीआय, नाबार्ड, नीती आयोग, वित्तीय सेवा विभाग आणि पीएफआरडीएचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.




