Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

To The Point : पिंपरी-चिंचवड स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाल्यास पहिला खासदार कोण?

खासदार बारणेंना लोकसभेतील मताधिक्याचा आधार, भाजपाकडे चार संभाव्य नावे : माजी आमदार लांडे आणि माजी महापौर वाघेरे-पाटील यांचाही विचार होऊ शकतो

पिंपरी-चिंचवड | राजकीय विश्लेषण : महिला आरक्षणाशी जोडण्यात आलेल्या लोकसभा मतदार संघाच्या फेररचनेच्या घटनादुरस्ती विधेयकाच्या मसुद्याला शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. या सुधारीत मसुद्यानुसार, प्रत्येक राज्यामध्ये लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे संसदेत लोकसभेच्या जागा ८५० होणार आहेत. हे विधेयक ३० डिसेंबर रोजी लोकसभेत, तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यासाठी पुरेसे संख्याबळ सत्ताधारी भाजपा प्रणीत NDA कडे आहे.

लोकसभेच्या जागा वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील जागांची संख्या ४८ वरून ७२ होऊ शकते. या फेररचनेत पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ मिळेल, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास  उमेदवारीसाठी पहिली चुरस जागावाटपातच रंगू शकते. सध्या पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा विभाग मावळ लोकसभा मतदारसंघात, तर भोसरी शिरूरमध्ये आहे. या तिन्ही विभागांचा नव्या जागेत किती भाग येतो, यावर कोणाचा दावा प्रभावी ठरणार हे समोर येईल. त्यामुळे पुढील महिन्याभरात २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची पायाभरणी होणार आहे.

बारणेंना लोकसभेचा आधार, भाजपाकडे दोन विधानसभा विजय

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी चिंचवडमध्ये ७४ हजार ७६५, तर पिंपरीत १६ हजार ७३१ मतांची आघाडी घेतली होती. हे दोन्ही विभाग नव्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर राहिले, तर महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेच्या दाव्याला या कामगिरीचा आधार असेल. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे महेश लांडगे भोसरीतून, तर शंकर जगताप चिंचवडमधून विजयी झाले आहेत. त्यामुळे भोसरी आणि चिंचवडचा समावेश असलेल्या जागेवर भाजपाचा दावा बळकट होऊ शकतो.

माजी आमदार अश्विनी जगताप आणि महापौर रवी लांडगेही संभाव्य पर्याय

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड लोकसभा झाली आणि महायुतीमध्ये जागा भाजपाच्या वाट्याला आली, तर महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यासह चिंचवडच्या माजी आमदार अश्विनी जगताप आणि महापौर रवी लांडगे यांचाही विचार होऊ शकतो. अश्विनी जगताप यांनी २०२३ ची चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने जिंकली होती. जागा महिलांसाठी आरक्षित झाली आणि ती भाजपाकडे आली, तर त्यांच्या नावाला अधिक वजन मिळू शकते. महापालिका हद्दीतील भागांचा नव्या मतदारसंघात मोठा वाटा असेल, तर रवी लांडगे यांचा महापौरपदाचा अनुभव त्यांच्या दाव्याला आधार ठरू शकतो.

वास्तविक, महिला आरक्षणाच्या मुद्यावर मतदार संघ परिसीमन विधेयक भाजपाकडून मांडले जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची पहिली महिला खासदार म्हणून अश्विजी जगताप यांचे नाव पहिल्या चर्चेत येवू शकते. कारण, शहरामध्ये भाजपाची सत्ता आणण्यामध्ये त्यांचे पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठे योगदान दिलेले आहे.

भोसरीचा समावेश झाल्यास माजी आमदार विलास लांडे यांचे नावही महत्त्वाचे

भोसरीचा मोठा भाग नव्या मतदारसंघात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांचाही संभाव्य उमेदवार म्हणून विचार होऊ शकतो. महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीला ही जागा सोडली, तर लांडे प्रमुख दावेदार असतील. भोसरीचे विधानसभेत प्रतिनिधित्व केल्याचा अनुभव त्यांच्या नावाला वजन देऊ शकतो. मागास प्रवर्गातून पिंपरीत अण्णा बनसोडे यांच्या २०२४ मधील विधानसभा विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागावाटपात दावा मांडण्यास आधार आहे. अशा रचनेत पिंपरी आणि भोसरी या दोन्ही विभागांतील मतदारांपर्यंत पोहोचू शकेल, अशा उमेदवाराला प्राधान्य मिळू शकते.

माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांना लोकसभा लढतीचा अनुभव

माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी संभाव्य पर्याय ठरू शकतात. २०२४ मध्ये त्यांनी मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली आणि संपूर्ण मतदारसंघात ५ लाख ९६ हजारांहून अधिक मते मिळवली. मात्र, महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपासोबत जुळवून घेतले होते. महापौरपदाचा अनुभव आणि पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा विभागांचा समावेश असलेली लोकसभा निवडणूक लढवल्याचा अनुभव, या दोन्ही बाबी त्यांच्या दाव्याला आधार देऊ शकतात. भोसरी नव्या मतदारसंघात आली, तर २०२४ मध्ये त्या विभागात डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जागेचा दावा केला, तरी जागावाटपात ठाकरे गट, काँग्रेस यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

विशेष म्हणजे, मतदार संघ परिसीमन विधेयकाला काँग्रेस आणि ठाकरे गटाने तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठींबा दिला आहे. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीपर्यंत पवार गट महाविकास आघाडीसोबत राहील का? हेसुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तुर्तास… पिंपरी-चिंचवडचा मोठा भाग नव्या लोकसभा मतदार संघात आल्यास ती जागा शिवसेनेला मिळाली, तर बारणेंच्या दाव्याला मागील लोकसभा निकालाचा थेट आधार असेल. भोसरीचा समावेश झाल्यास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यांनाही वजन येऊ शकते. पहिल्या खासदाराच्या लढतीचे चित्र नव्या मतदारसंघाची हद्द, आरक्षण आणि जागावाटप स्पष्ट झाल्यावर ठरेल. मात्र, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, महापौर रवि लांडगे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे हे प्रमुख दावेदार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group