चिखली: घरकुल प्रकल्पातील तयार सदनिकांची लाभार्थ्यांना प्रतिक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/photo-1-1-1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखली येथील घरकुल योजनेतील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप केले जात नाही. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात देखील नाही. पिंपरी-चिंचवडमहापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला केवळ पोसण्याचे काम सुरू आहे. घरकुल प्रकल्पातील तयार घरे लाभार्थींना तातडीने वाटप करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात अजिज शेख यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत चिखली येथे घरकुल योजना राबविली आहे. २००८ पासून सुरू असलेली ही योजना अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. दहा वर्षांत काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु, अनेक लाभार्थी अजूनही हक्काचे घर कधी मिळणार याकडे गेल्या दहा वर्षांपासून टक लावून पाहत आहेत. तरी, या तयार घरांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेख यांनी केली आहे.