घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून दोघांचा मृत्यू, ३-४ घरे ढिगाऱ्याखाली

Ghatkopar Landslide | मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर पूर्व येथील चिराग नगर परिसरात मध्यरात्री साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास भीषण दरड कोसळली. राठोड मेडिकलजवळील गौशिया चाळीवर टेकडीवरून माती व दगडांचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई अग्निशामक दल, एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४८ च्या सुमारास या घटनेची नोंद झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. “सततच्या पावसामुळे दरड कोसळली असून आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी ४ ते ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून बचावकार्य वेगाने सुरू आहे,” अशी माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली. या दुर्घटनेत सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा
‘कनेक्टिंग लिंक’ आज ३ तास बंद; ‘हा’ असेल पर्यायी मार्ग!
मुंबईतल्या कुर्ला पश्चिम इथल्या चिरागनगर इथं झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला असून, ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचं वृत्त, बचाव आणि मदतकार्य सुरु. pic.twitter.com/7jdgyZSM09
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 12, 2026
मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत; पुनर्वसनाचे आदेश
घाटकोपरमधील या दुर्दैवी दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, या परिसरातील धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिकांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.





