ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड नको; पावसामुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा – महापौर रवि लांडगे

पिंपरी | क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् तसेच क्रांतिवीर चाफेकर प्राथमिक विद्यामंदिर येथे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची व झालेल्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

पाहणीदरम्यान शैक्षणिक इमारतीचा परिसर, पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेली ठिकाणे, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंतीलगतचा परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वावराच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी संबंधित विभागांनी केवळ तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती न करता आवश्यकतेनुसार तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, असे निर्देश महापौर लांडगे यांनी दिले.

परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी ड्रेनेज व स्टॉर्म वॉटर व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी, नुकसान झालेल्या बांधकाम व संरचनात्मक भागांची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करावी, धोकादायक अथवा असुरक्षित ठिकाणे तातडीने सुरक्षित करावीत तसेच विद्यार्थ्यांच्या वावराच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा

जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

तसेच, संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संस्थेच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा. आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करून तातडीच्या कामांना विलंब न करता सुरुवात करावी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशाही सूचना महापौर लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अथवा त्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई स्वीकारली जाणार नाही.”

यावेळी मा. नगरसदस्य सुरेश भोईर, क्षेत्रीय अधिकारी गोरख लिमन, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, आरोग्य निरीक्षक महेश जगताप तसेच संबंधित अधिकारी व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button