थायलंड–म्यानमार सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्नांना वेग

मुंबई : थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागात रोजगाराच्या आमिषाने नेऊन अडकविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत नाशिकमधील अडकलेल्या तरुणांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला.
या विषयाची गंभीरता ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आणि भारतीय दूतावास, बँकॉक यांच्याशी तातडीने समन्वय साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची सुरक्षित सुटका करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील २५ हून अधिक तरुणांसह देशभरातील ४०० हून अधिक युवक या प्रकरणात अडकले आहेत. फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींना बळी पडून काही तरुण थायलंडमध्ये गेल्यानंतर त्यांना म्यानमार सीमावर्ती भागात नेऊन बेकायदेशीरित्या डांबून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या तरुणांकडून दररोज १६ ते १८ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात असून, काम करण्यास नकार दिल्यास अमानुष छळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला दिली आहे.
हेही वाचा – ‘दर्जेदार शिक्षणासाठी प्राथमिक शाळांच्या सुधारणांवर भर’; शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील अनेक तरुण परदेशात अडकले असून त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन या संपूर्ण प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. केंद्र शासन, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून अडकलेल्या प्रत्येक तरुणाची सुरक्षित सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तरुणांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सुरक्षित सुटकेसाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात येतील, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवू नये. संबंधित कंपनी, एजंट आणि रोजगार प्रक्रियेची सखोल पडताळणी करूनच परदेशात जाण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





