‘देवेंद्र फडणवीसांचे त्यांच्याच बॉसकडून पंख छाटण्याचं काम सुरू’; उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा

परभणी | दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने मुंबई ते नागपूर असा एकत्र प्रवास केला होता. या विमान प्रवासानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, आता उद्धव ठाकरे यांनी या प्रवासाबाबत एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “विमान प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला अत्यंत हतबल आणि आत्मविश्वास गमावलेले वाटले; कारण त्यांच्याच बॉसकडून त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे,” असा मोठा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
एकत्र केलेल्या विमान प्रवासाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे सभेत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परवा माझ्याबरोबर विमानात होते. पण यावेळी ते मला प्रचंड हतबल दिसून येत होते. म्हणजे कळत नव्हतं की हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण तरीही हतबल का झालेत? ते आत्मविश्वास गमावलेला माणूस दिसत होते.”
या हतबलतेमागचे कारण सांगताना ठाकरे पुढे म्हणाले, “त्यांनाही (फडणवीस) आता हे कळून चुकले आहे की, आपले पंख कापले जात आहेत आणि पंख कापणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे स्वतःचेच बॉस आहेत. अशा परिस्थितीत आपण करायचं काय? न्याय कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोठवायचं? कारण दार उघडलं की पंख कापणार! त्यामुळे जे काही वाचले आहे, ते वाचवून जेवढे दिवस उरलेत तेवढे ढकललेले बरे, अशा मनःस्थितीत सध्या देवेंद्र फडणवीस आहेत.”
हेही वाचा
पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण
“नितीन गडकरींच्या निष्ठेत इथेनॉलचं पाणी घातलं”
भाजपमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही उदाहरण दिले. “प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले तर? जसे तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरीही शर्यतीत होते. गडकरी भाजपचे अध्यक्ष होते आणि ते पुन्हा अध्यक्ष होणार होते. जर ते पुन्हा अध्यक्ष झाले असते, तर कदाचित देशाचे पंतप्रधान झाले असते. त्यामुळे नितीन गडकरी यांचे पंख असे काही कापले की त्यांच्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं. आता बिचारे गडकरी काहीच करू शकत नाहीत,” अशी टिप्पणी ठाकरेंनी केली.
विमान प्रवासानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण
२६ जून रोजी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी एकाच विमानाने प्रवास केल्याचे व्हिडिओ समोर आले होते. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये विमानात नेमकी काय राजकीय चर्चा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज २८ जून रोजी परभणीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांच्या ‘हतबलतेचा’ दावा केल्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





