भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये!
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन : आमदार महेश लांडगे यांच्या ७ विविध मागण्यांना ‘‘ग्रीन सिग्नल’’
मुंबई | विशेष प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिवीर चापेकर बंधूंची भूमि पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी समर्पित कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र उभारण्याचा संकल्प आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहराचे भूषण आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवड शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या विकासाशी निगडित ७ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, अनेक विषयांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.
भारतातील आदिवासी कला-कौशल्य लूप्त होत आहेत. इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढलेला असताना, भारतीय संस्कृती, सभ्यता यांचा पुरस्कार आणि प्रचार करणारे केंद्र उभारले जावे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात १५ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने केली होती. यावर पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी १० हेक्टर जागा आणि दुसऱ्या टप्प्यात ५ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. यामध्ये संकूलाचे बांधकाम आणि ओपन स्पेस असा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
तसेच, या बैठकीत मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या आयआयएम नागपूरच्या उपशाखेसाठी जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लागला. याबाबतचा आदेश सात दिवसांत पारित करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाला गती मिळणार आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीस आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्य शासनाकडून त्यास मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने समन्वय साधून सहा महिन्यांत कालबद्ध कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाला स्वतंत्र इमारत
भोसरी विधानसभा मतदारसंघातील तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी कायमस्वरूपी इमारती उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महसूल सेवांमध्ये होणारा विलंब दूर करण्यासाठी अपर तहसीलदार कार्यालयातील पदभरती आणि पदवाढीसही तत्त्वतः मान्यता देण्यात आली. बोपखेल, डुडूळगाव, चऱ्होली बुद्रुक आणि चौविसावाडी ही गावे नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी देण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले. त्यामुळे नागरिकांना महसूल कामांसाठी पुणे कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी हक्काची जागा…
याशिवाय, अपर तहसीलदार पिंपरी-चिंचवड कार्यालयासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी १५ दिवसांत पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. या सर्व विषयांचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडकरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. “पिंपरी-चिंचवडच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील,” असे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.

“क्रांतिवीर चापेकर बंधू हे पिंपरी-चिंचवडसह भारताचे भूषण आहे. या राष्ट्रप्रेमी विचारांचे स्मरण होईल आणि भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र माझ्या पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे, याचा विशेष अभिमान वाटतो. यासह भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि शहराच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. आयआयएम मोशी प्रकल्प, प्राधिकरण मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन कार्यक्षेत्र विस्तार, महसूल कार्यालयांची उभारणीचा विषय आता मार्गी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





