उद्धव ठाकरेंचं मन मोठं, पण…; बंडखोर खासदारांना आदित्य ठाकरेंची साद

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा बंडखोरीचे मोठे ढग जमा झाले आहेत. पक्षाच्या ६ खासदारांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, ते संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा गट पुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या संभाव्य बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार फुटण्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी थेट आणि बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, “बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आम्ही स्वतः दौरा करणार आहोत. पुन्हा एकदा डरपोक लोक पैसे खाऊन पळाले आहेत. आम्ही थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहोत आणि या गद्दारांचा खरा चेहरा समोर आणणार आहोत.”
हेही वाचा
पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलिनसह १६ औषधांवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, आमदार वरुण सरदेसाई आणि किशोर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “संसदीय पक्षाच्या बैठकीला जे खासदार उपस्थित होते, ते सर्वांनी पाहिले आहेत. जे बैठकीला आले नाहीत, पण ज्यांना पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा असेल, तर त्यांनी नक्की यावे. कारण उद्धव ठाकरेंचे मन खूप मोठे आहे. परंतु, जे जाणीवपूर्वक पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांच्यावर कडक कारवाई निश्चित होईल.”
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची भूमिका सध्या ‘तळ्यात-मळ्यात’ असली, तरी “आता राजकीयदृष्ट्या बुडायचं की नाही, हे त्यांनी स्वतःच ठरवावं,” असा थेट सल्ला आणि इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.





