वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा

INDW vs PAKW : वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 षटकांमध्ये 106 धावांवर गुंडाळलं. भारताने यासह पाकिस्तानवर 64 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाचा वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा सातवा विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानला टी 20i क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची ही चौथी वेळ ठरली.
पाकिस्तानसाठी विजयी धावांचा पाठलाग करताना एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानसाठी ओपनर मुनीबा अली हीने सर्वाधिक धावा केल्या. मात्र दीप्ती शर्मा हीच्या अचूक थ्रोमुळे मुनीबाच्या खेळीचा शेवट झाला. दीप्ती मुनीबाला रन आऊट केलं. मुनीबाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या. मुनीबा व्यतिरिक्त टीम इंडियासमोर एकाही फलंदाजाला 20 हा आकडा गाठता आला नाही. आलिया रियाझ हीने 18 धावा केल्या. तर गुल फिरोझा आणि आयेशा झफर या दोघींनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. त्याशिवाय भारतीय गोलंदाजांसमोर एकीलाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही.
टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. श्री चरणी हीने तिघांना आऊट केलं. तर शफाली वर्मा हीने 1 विकेट घेत दोघींना चांगली साथ दिली. भारताने यासह विजयी सलामी दिली.
टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी स्मृती मंधाना, कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष या तिघींनी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वात मोठी आणि एकूण तिसरी धावसंख्या उभारता आली. स्मृती मंधाना हीने 68 तर हरमनप्रीतने 36 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी ऋचा घोष हीने 200 च्या स्ट्राईक रेटने 17 चेंडूत 34 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यामुळे भारताला 170 धावांपर्यंत पोहचता आलं. तर पाकिस्तानसाठी सादीया इक्बाल आणि फातिमा सना या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.





