ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेल्यानंतर आता कोच गंभीरने दिला इशारा, म्हणाला, “सामन्याच्या गरजेनुसार खेळ, कारण…”

Gautam Gambhir on Rishabh Pant Vice Captaincy Snub: भारत-अफगाणिस्तान यांच्यातील कसोटीपूर्वी ऋषभ पंतकडून कसोटी संघाचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर पंतचं उपकर्णधारपद काढून घेत केएल राहुलकडे ही जबाबदारी सोपवली. यानंतर आता अफगाणिस्तान कसोटीपूर्वी कोच गौतम गंभीर यांनी पंतला वॉर्निंग दिली आहे. त्याच्या खेळण्याच्या शैलीबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं की, ऋषभ पंतने आपल्या नैसर्गिक आक्रमक फलंदाजीच्या शैलीत बदल करण्याची गरज नाही. मात्र, त्याने सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळण्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. गंभीर यांचे हे मत भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी एक दिवस आधी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत आहे. दोघांच्याही मते, पंतची आक्रमकता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे, परंतु त्या आक्रमकतेचा वापर योग्य वेळी आणि संघाच्या गरजेनुसार होणं तितकंचं महत्त्वाचं आहे.
गंभीर यांनी अप्रत्यक्षपणे पंतला त्याची नैसर्गिक शैली कायम ठेवण्याचा सल्ला दिला असला, तरी प्रत्येक परिस्थितीत आक्रमक खेळण्याऐवजी डावाची गरज ओळखून निर्णय घेण्यावर भर दिला. ऋषभ पंतला मागील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करताना उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर अजूनही पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा – शांत झोप लागत नाही? शांत झोपेसाठी आजपासून ‘हे’ पदार्थ खाण्यास करा सुरुवात, फायदे घ्या जाणून
अफगाणिस्तान कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाले, “आम्हाला ऋषभ पंतने त्याची शैली बदलावी असं वाटत नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी सामन्याच्या परिस्थितीचा आदर करणं आवश्यक असतं. ऋषभकडे असलेली नैसर्गिक प्रतिभा आणि त्याची आक्रमक शैली आम्हाला अजिबात बदलायची नाही. पण काही प्रसंगी त्याने सामन्याच्या गरजेनुसार आपल्या खेळात थोडेफार बदल केले, तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. भविष्यात तो या बाबींवर काम करताना दिसेल.”
ऋषभ पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयाबाबत बोलताना भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्काटे यांनी ऋषभ पंत याच्या नेतृत्वगुणांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगताना म्हणाले, “माझ्या मते, अशा उच्च दर्जाच्या संघात लीडर होण्यासाठी एखाद्या अधिकृत पदाची गरज नसते. ऋषभलाही ही गोष्ट चांगलीच समजते.”
ऋषभ पंत अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळण्यासाठी उतरताच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५० वा सामना खेळेल. पंतने आतापर्यंत ४९ कसोटी सामन्यांमध्ये ४२.९१ च्या सरासरीने व ७४.२४ च्या स्ट्राईक रेटने एकूण ३,४७६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ८ शतकं आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका व बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पंतच्या या आक्रमक शैलीवर बरीचशी टीका झाली होती. पंत आक्रमक फटके खेळत बाद झाल्याने संघाला त्याचा फटका बसला होता.





