रॉयल ‘चॅम्पियन्स’ बंगळुरू! RCBच्या विजयाचा जल्लोष होणार, पण विजयी परेड निघणार का? महत्वाची माहिती समोर

Royal Challengers Bengaluru Victory Parade: आयपीएल ट्रॉफी जिंकणं हा कुठल्याही संघासाठी खास क्षण असतो. १५-१५ सामने जिंकणं आणि २ महिने सतत क्रिकेट खेळल्यानंतर जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळते. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तर या हंगामातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत केलं आणि सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. पण या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ व्यवस्थापकांनी मोठा निर्णय घेतला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिलं जेतेपद पटकावण्यासाठी १८ वर्ष वाट पाहावी लागली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंगळुरूत विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हे एक प्रमुख कारण आहे.
हेही वाचा – सावधान! लहानपणीचे जंक फूड मेंदूचे करू शकते ‘लाइफटाईम’ नुकसान; नवीन रिसर्च काय सांगतो?
तर दुसरं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री डीके शिवकुमार शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम लोक भवन येथे संध्याकाळी ४:१० मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम लक्षात घेता विजयी परेड आणि सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह काही खेळाडू आहेत, जे मालिका आणि पुढील स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघासोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे यावेळी कुठलंही सेलिब्रेशन केलं जाणार नाही. “आम्ही कोणत्याही सार्वजनिक उत्सवांना परवानगी देणार नाही. जर कोणाला उत्सव साजरा करायचा असेल, तर ते घराच्या आत करू शकतात.” असे बंगळूरु शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी म्हटले होते.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. वॉशिंग्टन सुंदरने गुजरातचा डाव सांभाळला. त्याने अर्धशतकी खेळी करुन संघाची धावसंख्या १५५ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने ७५ धावांची खेळी केली आणि ५ गडी राखून विजय मिळवला.





