Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी

पुणे | पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे यांच्या नावावर रविवारी रात्री तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मोठी ताकद लावली होती.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रविवारी रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली ही बैठक पहाटे दीड वाजेपर्यंत चालली. या बैठकीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह माजी खासदार संजय काकडे हे स्वतः उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते, तर दुसरीकडे भाजपमधील काही इच्छुक नेत्यांनीही या जागेवर दावा केला होता.

हेही वाचा

घरे खरेदी करणे आणखी महागले! मुंबईत घरांच्या किमतीत २० टक्के तर पुण्यात ११ टक्क्यांची वाढ

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणे निश्चित झाले. मात्र, उमेदवार कोण? यावरून उशिरापर्यंत खल सुरू होता. अखेर विक्रम काकडे यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत, पण…

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आघाडीवर होते. महायुतीचे तेच एकमेव अधिकृत उमेदवार असतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अंतिम क्षणी सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावाला पसंती दिल्याने सर्व राजकीय अंदाज फोल ठरले आणि काकडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

पुण्यात ‘पवार विरुद्ध पवार’ थेट सामना

दुसरीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना मैदानात उतरवले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. आगामी दिवसांत या निवडणुकीत काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button