Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात प्रवेश; शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू असून आज महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ऐनवेळी दुसरा उमेदवार द्यावा लागला होता. एवढंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीमधून माघार घेतली होती.

दरम्यान, आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा –  शहरातील अवैध दारूच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई होणार; मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून १ लाखांची मदत जाहीर

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांचे मी आभार मानतो, त्यांनी आम्हाला भाजपात प्रवेश दिला. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागावे. माझा मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागावे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीजेचे, पाण्याचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटावेत. अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. मी आज जास्त काही बोलू शकणार नाही. मात्र, यापुढे पक्ष जी आमच्यावर जबाबदारी देईल, ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण करू असा विश्वास मी आपल्याला देतो”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी आज मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केल्यानंतर आता प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून प्राजक्त तनपुरे यांचं मन वळवल्याची चर्चा होती.

भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. ‘आता कोणत्याही बांधावर गेलात तरी फक्त ‘कमळ’च दिसेल’ असं म्हणत ‘आता भाजपात तीन-तीन ‘दादा’ दिसतील’ असं सुजय विखे यांनी म्हटलं होतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button