‘मिसिंग लिंक’ नव्हे, ही तर ‘कनेक्टिंग लिंक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला. सुमारे १३ किमी लांबीच्या या नव्या मार्गिकेला आतापर्यंत ‘मिसिंग लिंक’ असे संबोधले जात होते. मात्र उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मार्गिकेला ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधावे, असे आवाहन केले.
कनेक्टिंग मार्गिकेची माहिती देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीकाही केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा २०१० साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही, यासाठी आधीच्या सरकारने १३ कारणे दिली. यात एक कारण असेही होते की, लोणावळा तलावाच्या खालून हा मार्ग जात असल्यामुळे तो करता येणार नाही, असेही एक कारण यात दिले गेले.
हेही वाचा
डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महायुतीचे सरकार आल्यानंतर मी एमएसआरडीसीचे अधिकारी मोपलवार, आनंद कुलकर्णी यांना याबाबतचे कारण विचारले. त्यांनी हा मार्ग होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. डिसेंबर २०१५ ला जुन्या सरकारचा निर्णय बदलून आम्ही मिसिंग लिंक करणार असल्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.
१८२ मीटर उंचीच्या केबलस्टेड पुलाबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियांत्रिकी आव्हान होते. याठिकाणी जोरदार वारे वाहत असतात. रायगड जिल्ह्यापासून ते पुण्यापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वेगवेगळा आहे. हे सर्व लक्षात घेऊन पुलाची उभारणी करण्यात आली. मागच्या काळात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १३० ते १५५ किमी होता. आपण तयार केलेला केबलस्टेड पूल ताशी २४० किमी वेग असतानाही तग धरू शकतो. चक्रीवादळापेक्षा दुप्पट गतीने वारा वाहिला तरी या पुलाला काही होणार नाही.
भारतासहीत सात देश या पुलाच्या उभारणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते. याचे मूळ डिझाइन कॅनडामध्ये तयार झाले. डेन्मार्कमध्ये त्याची विंड टेस्ट करण्यात आली. केबलची चाचणी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आली. केबलचे उत्पादन मलेशियाच्या कंपनीने केले. रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज यांनी संयुक्तपणे केले. पुलाचे आरेखन तैवानच्या कंपनीने केले. व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट सिंगापूरचे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.





