‘ईव्हीएममध्ये फेरफार केल्यास आरपारची लढाई!’; ममता बॅनर्जींचा थेट इशारा

Mamata Banerjee | पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ईव्हीएम सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, “जर ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा किंवा चोरीचा प्रयत्न झाला, तर आम्ही ‘आरपारची लढाई’ (Life-and-death fight) लढू,” असा थेट इशारा त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला दिला आहे.
कोलकात्याच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत, त्या ‘साखावत मेमोरियल स्कूल’मधील स्ट्राँग रूमला ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा करत त्यांनी सुमारे तीन तास तिथे ठाण मांडून बसणे पसंत केले. सुरुवातीला केंद्रीय दलाच्या जवानांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र “एक उमेदवार म्हणून मला स्ट्राँग रूमपर्यंत जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे,” असे सांगत त्यांनी आपला मार्ग मोकळा केला.
हेही वाचा
पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
तृणमूलचा व्हिडिओद्वारे गंभीर आरोप
तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात काही लोक अनधिकृतपणे मतपेट्या हाताळत असल्याचा दावा केला आहे. भाजप आणि निवडणूक आयोग संगनमताने निवडणुकीत फेरफार करत असल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. “भाजपने परराज्यातून लोक आणून कोलकात्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. दीदींच्या एका आदेशावर १०,००० लोक काही मिनिटांत रस्त्यावर उतरू शकतात, पण आम्ही कायद्याचा मान राखत संयम पाळला आहे. पण जर ईव्हीएमला हात लावला, तर त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा इशारा तृणमूलने दिला आहे.
कार्यकर्त्यांना २४ तास पहारा देण्याचे आदेश
ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मतमोजणी पूर्ण होईपर्यंत २४ तास सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ईव्हीएम स्ट्राँग रूममधून मतमोजणी केंद्रापर्यंत नेले जात असताना ‘मशिन बदलण्याचा’ कट रचला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. “जर मी स्वतः पहारा देऊ शकते, तर तुम्हीही देऊ शकता,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना केंद्रांवर तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत.





