पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांना गती द्या : राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आढावा बैठक : शहरातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विकास प्रकल्प वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या शहरातील विविध विकासकामांच्या सविस्तर आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस महापौर रवि लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर सुधार समिती सभापती संजय काटे, तसेच अनेक नगरसेवक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपसंचालक नगररचना किशोर गोखले, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार महापौर रवि लांडगे यांनी मानले.
विकासकामांचा सविस्तर आढावा
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठा, अमृत 2.0, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो, रस्ते विकास, नदी सुधारणा, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन केंद्र, महिला वसतिगृह आणि इतर प्रकल्पांची सविस्तर माहिती सादर केली. राज्यमंत्री मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाचा प्रगतीदर, निधी वितरण आणि अडचणींचा आढावा घेत तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक सुविधा, उद्याने आणि नागरी सेवांमध्ये दर्जा वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
राज्यमंत्र्यांचे मुख्य निर्देश…
बैठकीत राज्यमंत्री मिसाळ यांनी खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला: सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, पीएमआरडीए, महानगरपालिका व पीएमपीएमएल यांच्यात समन्वय वाढवणे, पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना प्राधान्य, रस्ते व वाहतूक सुधारणा, सार्वजनिक ठिकाणे व उद्यानांचा दर्जा वाढवणे, लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देणे असे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले आहेत.
“इंद्रायणी नदी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी उगमापासून देहूपर्यंत एसटीपी प्रकल्प लागू करणे आवश्यक आहे. घरकुल प्रकल्पातील अपूर्ण कामे व मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेऊन सदनिका धारकांचा कर माफ करण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर करावा.”
– महेश लांडगे, आमदार.
“मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणी गरज लक्षात घेऊन पवना नदीतून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प तातडीने राबवावा.”
– शंकर जगताप, आमदार.





