‘भारत दहशतवादापुढे झुकणार नाही’; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे हे नीच मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला बुधवारी वर्ष झाले. सबंध देशासाठी अत्यंत वेदनादायी ठरलेल्या या घटनेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांनी स्मरण करत शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. हल्ल्यात नातेवाईक गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. एक राष्ट्र म्हणून, आम्ही या शोकाच्या प्रसंगी एकजूट होऊन उभे आहोत, असे मोदी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घृणास्पद कृत्यात निष्पाप जीवांचे झालेले नुकसान आपल्या सामूहिक स्मृतीत कायमचे कोरले गेले आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; चर्चा निष्फळ
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यासंदर्भात भावना व्यक्त केल्या. हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर सैनिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. द्वेष आणि भीती पसरवणार्या शक्तींपुढे भारत कधीही झुकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिम राष्ट्रीय मंचने (एमआरएम) दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी केली आहे. तसेच, दहशतवादाविरोधात तीव्र निदर्शने केली.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. दहशतवाद आणि त्याला आश्रय देणार्यांविरुद्ध भारताचे शून्य सहिष्णुता धोरण अविरतपणे सुरू राहील.





