देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिला किती? अंजली दमानियांचा सवाल

मुंबई | ‘नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच महाराष्ट्रातही राजकीय वाद रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्रिमंडळातील महिला प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सवाल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ही लाजिरवाणी बाब असून महिला सशक्तीकरण ही आमच्यासाठी बांधिलकी असल्याचे ते म्हणाले. विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे फडणवीस म्हणाले. देशाने विरोधकांची नौटंकी पाहिली. या विधेयकाला विरोध करून ते नेमकं कोणाच्या हितासाठी काम करता हे स्पष्ट झालं, अशी टीका त्यांनी केली. विरोधी पक्ष बँड वाजवून डान्स करावा. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर आता अंजली दमानियांनी एक पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा : स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या प्रस्तावाला विधी समितीची मंजुरी
“विरोधी पक्षाने बँड वाजवून डान्स करावा”. हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजापने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये, फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह ! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३% (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डान्स करेल.” अशी खोचक पोस्ट अंजली दमानियांनी केली आहे.





