अॅक्सिस बँकेत माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणं; अमृता फडणवीसांचे विधान चर्चेत

मुंबई | नाशिकच्या टीसीएस कंपनीत गेल्या चार वर्षांपासून लैंगिक शोषण, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यस्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही भाष्य केलं असून अॅक्सिस बँकेत असताना त्यांच्यासमोरही असे प्रकार घडले असल्याचं त्यांनी सांगितलं.
माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख केला. अॅक्सिस बँकेत कार्यरत असताना त्यांच्या समोरही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. “अशी प्रकरणे पाहिली की खराब वाटतं. खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये असं होतंय. मी अॅक्सिस बँकेत होते, तेव्हाही माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली आहेत. त्याविरोधात व्हिसल ब्लोइंग (एखाद्या संस्थेतील भ्रष्टाचार, बेकायदेशीर कृत्य किंवा अनैतिक व्यवहारांची माहिती अधिकृतपणे उघड करणे) होऊन कायदेशीर आणि कॉर्पोरेट कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. त्यामुळे असं काही झाली की व्हिसल ब्लोइंग करणं गरजेचं आहे. समाजाला आणि आपल्या वरिष्ठांना सांगणं गरजेचं आहे, तरच यावर आळा घालता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; ट्रम्प यांचा इराणला इशारा
नाशिकचं टीसीएस प्रकरण नेमकं काय?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक प्रकल्पात सहकारी कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या गैरकृत्यांविषयी पीडितांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार, आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावणे, अश्लील टिप्पणी करणे, शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे आदी तक्रारींचा अंतर्भाव आहे. टीसीएस नाशिकमध्ये सुमारे २०० कर्मचारी काम करतात. यात निम्मे प्रमाण महिलांचे आहे.





