चिखलीतील दूषित पाणीप्रश्न गंभीर; नागरिक त्रस्त – प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीवरील पाणी उपसा केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मोशी प्राधिकरणासह सेक्टर ४, ६, ९, ११, संतनगर, मोशीगाव, डुडुळगाव आणि चऱ्होली परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनुसार पुरवठा होणाऱ्या पाण्यात गढूळपणा, दुर्गंधी, पिवळसर-हिरवट रंग तसेच काही ठिकाणी अळ्या व जंतू आढळून येत आहेत. यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि मळमळ यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र आळणे (अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स) यांनी विविध भागांतून पाण्याचे नमुने गोळा करून मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली असता, त्यात बॅक्टेरिया आणि आरोग्यास घातक घटक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालांमुळे पाण्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा : पवना नदी प्रदूषणाविरोधात अमरण उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
या समस्येवर श्री. रविंद्र आळणे, श्री. दीपक नाईक, श्री. नितीन यादव आणि श्री. किशोर थोरात यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. विविध सोसायट्यांनी अधिकृत तक्रारी, पत्रव्यवहार आणि ई-मेलद्वारेही समस्या मांडली आहे.
दि. ४ एप्रिल रोजी नागरिकांनी एकत्र येत महापौरांकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र समस्या अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ही समस्या नवीन नसून २०२५ मध्येही याच स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात परिस्थिती सुधारते, मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांची प्रमुख मागणी म्हणजे पूर्वीप्रमाणे पवना नदीतून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच चिखली-निघोजे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेची सखोल चौकशी करण्यात यावी.
… अन्यथा आंदोलन छेडणार!
या प्रकरणात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेत प्रशासनावर दबाव वाढवला आहे. ६ एप्रिल रोजी नियोजित आयुक्तांसोबतची बैठक रद्द झाल्यानंतर १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी ठोस कारवाईची मागणी केली. तसेच ११ एप्रिल रोजी जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. मूलभूत गरज असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





