..तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवालाच माहीत; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली | पश्चिम बंगालवर हल्ला करण्याचे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बंगालकडे नजर टाकली तर यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील, हे फक्त देवालाच माहीत, अशा स्पष्ट शब्दांत राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.
इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने काही आक्रमक पावले उचलण्याचा प्रयत्न केल्यास भारताकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा यापूर्वीच राजनाथ सिंह यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पश्चिम बंगालमधील कोलकात्यावर हल्ला करण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : ‘पुढील १२ तास रेल्वेचा वापर टाळा’; इस्रायलचा इराणी नागरिकांना इशारा
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ५५ वर्षांपूर्वीच्या पराभवाची आठवण करून दिली. ते म्हणाले, आसिफ यांनी अशी चिथावणीखोर वक्तव्य करू नयेत. ५५ वर्षांपूर्वी त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागले होते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर केवळ देवालाच माहीत यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.




