सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञान; ४०० शेतकऱ्यांची होणार निवड

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा आणि काजू शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. जिल्ह्यात या पिकांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) आधारित प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांची निवड करून हा प्रायोगिक प्रकल्प राबविला जाणार आहे.
मुंबई येथे आयोजित एका विशेष बैठकीत एडीटी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे निलेश नलावडे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक डॉ. भूषण गोसावी, मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे डॉ. वैभव शिंदे, धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष देशमुख आणि शास्त्रज्ञ डॉ. संजनी साळुंखे उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात आंबा आणि काजू उत्पादक प्रत्येकी २०० अशा एकूण ४०० शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या शेतकऱ्यांच्या शेतीचे संपूर्ण ‘डिजिटायझेशन’ केले जाणार असून, त्यांचा मूलभूत डेटा संकलित केला जाईल. बागांमध्ये आवश्यक ठिकाणी सेन्सर्स बसवून मातीची गुणवत्ता, झाडांची आरोग्य स्थिती आणि उत्पादनाचे परीक्षण केले जाईल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घेतले जाईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महाराष्ट्रच्या कृषी मंत्र्यांनी घेतली भेट
पारंपरिक पद्धतीने बागेत फवारणी करण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात, मात्र ड्रोनच्या साहाय्याने हे काम अवघ्या काही तासांत पूर्ण होऊ शकते. यामुळे रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे होईल. तसेच, एआय आधारित ‘प्रिडिक्टिव्ह मॉडेल’मुळे पिकांवर येणाऱ्या रोगांचा अंदाज आधीच वर्तवता येईल.
परिणामी, कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळता येईल आणि काळ्या बाजारावरही नियंत्रण मिळवता येईल. हा प्रकल्प केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी २० ते २५ शेतकऱ्यांचे गट तयार करून प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील. १५० दिवसांच्या पहिल्या टप्प्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यांत्रिकीकरण वाढण्यास मोठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.





