BCCI ची मोठी घोषणा; नमन अवॉर्ड्स 2026 मध्ये नवीन चेहरे चमकले

BCCI Naman Awards 2026 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वार्षिक पुरस्कार 2026 म्हणजेच नमन अवॉर्ड्सची अधिकृत घोषणा केली आहे. हा भव्य आणि बहुप्रतिक्षित पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये अतिशय दिमाखात पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक उत्कृष्ट खेळाडू, माजी दिग्गज क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंचांना विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात येणार आहे.
यंदाच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आधीच निश्चित करण्यात आले आहेत. 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज यांनाही हा विशेष पुरस्कार मिळणार आहे.
हेही वाचा : सोनम वांगचुक यांच्यावरील एनएसए कारवाई रद्द, तात्काळ सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश
बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेनुसार भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला ‘पॉली उमरीगर अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान गिलला सलग दुसऱ्यांदा मिळत आहे. तसेच महिला संघातून स्मृती मानधना हिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात येणार असून, हा तिचा पाचवा सन्मान आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिली जाणारी जगमोहन दलमिया ट्रॉफी मुंबईच्या इरा जाधव हिला दिली जाणार आहे. तसेच सीनियर महिला घरेलू वनडे स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून शेफाली वर्मा हिला हीच मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात येईल.
पुरुष घरेलू क्रिकेटमध्ये मुंबईच्या आयुष म्हात्रे याला लिमिटेड ओव्हर्स स्पर्धेत सर्वोत्तम ऑलराउंडर म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार मिळणार आहे. तर विदर्भाच्या हर्ष दुबे याला रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम ऑलराउंडर म्हणून हाच पुरस्कार दिला जाईल. याशिवाय, 5 आयसीसी विश्वविजेत्या भारतीय संघांचा एकाच मंचावर गौरव करण्याचा ऐतिहासिक क्षण या सोहळ्यात पहिल्यांदाच पाहायला मिळेल.





