सोनम वांगचुक यांच्यावरील एनएसए कारवाई रद्द, तात्काळ सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश

Sonam Wangchuk | लडाखमधील परिस्थिती शांत करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत करण्यात आलेली स्थानबद्धतेची कारवाई केंद्र सरकारने मागे घेतली आहे. वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गितांजली जे. अंगमा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवरही या प्रकरणाला वेग आला होता. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे. अंगमा यांनी वांगचुक यांच्यावर एनएसए अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईला आव्हान दिले होते.
हेही वाचा : पूर्व आशियात तणाव वाढला; उत्तर कोरियाने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, जपानमध्ये हाय अलर्ट
२४ सप्टेंबर २०२५ रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत सोनम वांगचुक यांना २६ सप्टेंबर २०२५ रोजी एनएसए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता.
केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वांगचुक यांनी एनएसए अंतर्गत स्थानबद्धतेचा जवळपास अर्धा कालावधी पूर्ण केला आहे. लडाखमधील जनतेच्या अपेक्षा आणि चिंतांचे निराकरण करण्यासाठी सरकार विविध भागधारक आणि समुदाय नेत्यांशी संवाद साधत आहे. मात्र, सध्याचे बंद आणि आंदोलनाचे वातावरण विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिक आणि पर्यटकांपर्यंत सर्वांवर नकारात्मक परिणाम करत असल्याचे सरकारने नमूद केले आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून सोनम वांगचुक यांची स्थानबद्धता तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.





