राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; काही ठिकाणी गारपिटीची शक्यता

मुंबई | राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या काळात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या हवामान बदलाचा परिणाम जाणवू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्चदरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, तसेच हवामानाचा अद्ययावत अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत.
संभाव्य पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.





