नितीन गडकरींचे ‘ते’ ट्विट अचानक गायब ; कुंभमेळ्याशी संबंधित पोस्टनंतर चर्चांना उधाण !

नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी द्वारका चौक सुधारण्याच्या योजनेला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती समाजमाध्यमातून समोर आली होती. परंतु, खुद्द मंत्री गडकरी यांच्या ‘एक्स’ खात्यावरून ही माहिती अर्थात ‘ट्विट’ काही वेळातच गायब झाल्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. मंत्री गडकरी यांनी असे का केले असावे, याची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाखालील द्वारका चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा महत्त्वाचा चौक आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते, बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच औद्योगिक व व्यापारी भाग यांना जोडणारा प्रमुख केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. कुंभमेळा काळात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता घेऊन द्वारका चौक सुधारणा प्रकल्पाचे नियोजन झाले आहे. त्या अंतर्गत आधुनिक पद्धतीने चौकाचे पुनर्रचना, उड्डाण पूल / ‘ग्रेड सेपरेटर’, सेवा रस्ते, सिग्नल यंत्रणा, पादचारी सुविधा तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी आवश्यक सोयी-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, माल वाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता लक्षणियरीत्या वाढेल, तसेच प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
हेही वाचा – इंद्रायणीनगरमध्ये तुषार सहाणे यांच्या ‘जनसागर’ उसळला
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी दुपारी ‘एक्स’ वर या संदर्भात माहिती दिली होती. ‘‘महाराष्ट्रातील नाशिक शहरात २०२७ मध्ये होत असलेल्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने द्वारका चौकाच्या सुधारणेसाठी २१४ कोटी रुपयांच्या तरतुदीसह प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होईल आणि माल वाहतूक व सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल.’’ असे त्यांनी त्यांनी म्हटले होते. ही माहिती वेगाने सर्वत्र पसरली. या मंजुरीमुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसह नाशिककरांनाही दीर्घकालीन उपाययोजना होणार असल्याची भावना निर्माण झाली. परंतु, काही वेळात समाज माध्यमावरील हे ट्विट गायब झाले. खुद्द गडकरी यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरही ते दिसत नव्हते. यामुळे संभ्रमात भर पडली.
या संदर्भात प्रशासकीय वर्तुळातून माहिती घेतल्यानंतर निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे आल्याचे सांगितले जाते. नाशिक महापालिकेची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान थेट शहराशी संबंधित प्रकल्पाला मंजुरी दिल्याचा विषय आचारसंहितेच्या कचाट्यात येऊ शकतो, असे कुणीतरी दिल्लीत निदर्शनास आणून दिल्यावर हे ट्विट समाजमाध्यमांतून गायब झाल्याचे बोलले जाते. नाशिक शहरातील कुंभमेळ्याशी संबंधित नव्या कामांची मंजूरी वा तत्सम विषय यंत्रणेने तुर्तास थांबवलेले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





