इंद्रायणीनगरमध्ये तुषार सहाणे यांच्या ‘जनसागर’ उसळला
रॅलीतून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल!

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणी नगरच्या विकासाचा ध्यास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार भिवाजी सहाणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी सेक्टर १ पासून निघालेल्या भव्य रॅलीत हजारो नागरिकांनी सहभागी होत ‘विकासाचा विचार, आपला तुषार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात सेक्टर १ येथून झाली. त्यानंतर सेक्टर २ येथील गणेश मंदिर, सेक्टर ३ गुरुविहार, सेक्टर ४, ६, ७, मोशी प्राधिकरण, सेक्टर १३, १०, १२ तसेच खांडे वस्ती आणि बालाजी नगर अशा संपूर्ण प्रभागातून ही रॅली मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी महिलांनी सहाणे यांचे औक्षण केले, तर तरुणांनी बाईक रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली.

”प्रभागातील जनतेचा हा उत्स्फूर्त पाठिंबाच माझी खरी ताकद आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाची ही पावती असून, आगामी काळात इंद्रायणी नगरला विकासाच्या मॉडेलवर नेण्याचा माझा मानस आहे,” असा विश्वास यावेळी तुषार सहाणे यांनी व्यक्त केला.




