गौतम अदाणींच्या भावाने शरद पवारांचा पक्ष फोडला आणि..; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई | पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदाणी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र आले आहेत. काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्या संबंधांवर टीका केली जात असतानाच, शरद पवार आणि गौतम अदाणी यांची एकत्रित उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर मोदींचा आणि भाजपाचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदाणी यांना मुंबईला ताब्यात दिली जाते आहे, त्याविरोधात आमची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे. ते उद्योगपती आहेत. पण गौतम अदाणींसारखा हव्यास इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचे दिसून येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत. पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे.
हेही वाचा : पुण्यात लाचार होऊन युती करू नका; रवींद्र धंगेकरांची ठाम भूमिका
शरद पवार आणि गौतम अदाीणींचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदाणींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. तर रोहित पवारांनी अदाणींच्या कारचं सारथ्य का केलं, हे त्यांनाच विचारा, असंही संजय राऊत म्हणाले.




