महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत उभारले जाणार नवीन आयटी पार्क; हजारो तरुणांना रोजगाराची संधी

पुणे : महाराष्ट्रातील आयटी क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असून राज्यातील तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमुळे महाराष्ट्राला आयटी हबची ओळख मिळाली असून, या पार्कमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आयटी पार्क म्हणून हिंजवडीचे महत्त्व वाढले आहे.
हिंजवडीनंतर आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन आयटी पार्क प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. साताऱ्यात उभारल्या जाणाऱ्या आयटी पार्कसाठी टाटा टेक्नॉलॉजीकडून प्रशिक्षण केंद्र विकसित केले जाणार असून, याद्वारे हजारो तरुणांना आयटी क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे कोल्हापूर आयटी पार्कचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. अनेक वर्षांपासून कागदावर असलेला हा प्रकल्प आता साकार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना शेंडा पार्क परिसरात आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा – ‘माझ्या डोक्यात कधीही मुख्यमंत्रीपदाची हवा नव्हती’;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून, पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आदेशानंतर ३४ हेक्टर जमीन आयटी पार्कसाठी, ६ हेक्टर जिल्हा क्रीडा संकुलासाठी आणि २ हेक्टर शासकीय दंत महाविद्यालयासाठी हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाची जमीन वापरली जाणार असल्याने पर्यायी जागा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयाकडे लक्ष ठेवले आहे.
पुणे (हिंजवडी), पुरंदर, सातारा आणि कोल्हापूर येथे आयटी पार्क सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात चार मोठे आयटी पार्क कार्यरत होतील. यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळून राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





