‘माझ्या डोक्यात कधीही मुख्यमंत्रीपदाची हवा नव्हती’;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : पुन्हा मुख्यमंत्री होणार का, या चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. “मी मुख्यमंत्री असतानाही एक कार्यकर्ता म्हणूनच काम केले. माझ्या डोक्यात कधीही मुख्यमंत्रीपदाची हवा नव्हती. आम्ही जनतेचे सेवक आहोत. मी कॉमन मॅन आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण जनतेला सोन्याचे दिवस द्यायचे आहेत,” असे शिंदे यांनी सांगितले.
विधानमंडळात बोलताना त्यांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या आर्थिक मदतीचा तपशील मांडला. काहीजण फक्त फिरून आले, पण साधा बिस्किटाचाही पुडा दिला नाही, असा टोला लगावत शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केल्याचे आकडे मांडले. अमरावती विभागातील २१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार कोटी रुपये, संभाजीनगर विभागाला ६ हजार ७४६ कोटी रुपये आणि पुणे विभागाला १ हजार ५८६ कोटी रुपये देण्यात आले असून, एकूण १५ हजार कोटी रुपयांचे वाटप थेट लाभार्थ्यांच्या खात्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी NDRF च्या नियमांमध्ये बदल केल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना शिंदे यांनी ही योजना कधीही बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. “कोणीही सत्तेत आले तरी ही योजना बंद होणार नाही. २२०० रुपये देणार म्हणजे देणारच,” असे ते म्हणाले.
राजकीय टीकांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतानाही काही जण घटनाबाह्य म्हणत होते आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही तेच आरोप केले जात आहेत. मात्र, अशा आरोपांकडे आपण लक्ष देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “कोणीही ‘माय का लाल’ आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. कितीही विरोध झाला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील,” असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.





