महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये प्रवेशबंदी

मुंबई: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याला, पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वीच २६४ नगरपालिका, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत. तर उर्वरित २४ नगरपालिका, नगरपंचायती आणि १५४ सदस्यांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरला होणार असून दोन्ही टप्यातील नगरपालिका, नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेना(शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला वाद आता विकोपास गेला आहे.
चव्हाण यांनी कल्याण- डोंबिवली महापालिका तसेच ठाणे जिह्यातील शिवसेनेच्या काही माजी नगरसेवक, नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन शिवसेना कमजोर करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कमालीचे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी भाजप नेत्यांच्या कानावर घातली असली तरीही भाजपाने राज्यभरात शिवसेनेतील नेत्यांना फोडण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शिवसेनेच्या गोठात अस्वस्थता पसरली असून भाजपच्या दगाबाजीने नाराज झालेल्या शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाला जशास तशे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याचे दिसून आले.
हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?
अशातच राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमधील वाद आणखी विकोपास जाऊ नये यासाठी महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप- शिवसेना यांच्यातील संघर्षाचे मुळ ठाण्यातील सत्तासंघर्षात असल्यामुळे ठाण्यातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासााठी महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये मतभेद झाले असून काही पक्षांमध्ये नाराजी आहे. मात्र आमच्यात मनभेद झालेले नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यास कसलेही मतभेद आणि मनभेदही नाहीत. स्थानिक पातळीवर वाद झाले असले तरी महायुतीला कसलाही धोका नाही. दोन- तीन दिवसात महायुतीचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री आण दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात यापुढे महायुतीमधील कोणत्याही नेता, पदाधिकारी, कार्यकर्त्यास दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही. विरोधकांमधील कोणालाही फोडल्यास, पक्षात प्रवेश देण्यास काही हरकत नाही. मात्र भाजपने शिवसेना किंवा राष्ट्रवादीमधील कार्यर्कत्यांना प्रवेश द्यायचा नाही. अशाच प्रकारे अन्य दोन्ही घटक पक्षांनी भाजपच्या लोकांना पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय घेण्यात येणार असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.





