बस अनियंत्रित झाल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मृतांमध्ये सख्ख्या बहिण-भावाचा समावेश

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील घटना
पिंपरी चिंचवड : हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कंपनीची बस पंचरत्न चौकाजवळ अचानक अनियंत्रित होऊन थेट फूटपाथवर घुसल्याने हा प्रकार घडला.
मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८), सूरज देवा प्रसाद (वय ६) तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा मृतदेह औंध रुग्णालयात हलविण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात एकच हळहळ पसरली.
अपघातात अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) गंभीर जखमी झाले असून विमल राजू ओझरकर (वय ४०) किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा – हजारो सोसायटी धारकांच्या उपस्थितीत चिखली मोशी चऱ्होली फेडरेशनचा “सहकार संवाद”
नशेत असल्याचा संशय; चालक ताब्यात
नशेत बस चालविल्याचा संशय असलेल्या नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दोन मुलांच्या मृत्यूला पुष्टी देत सांगितले की, “आम्ही पीडितांची पार्श्वभूमी व घटनेचे कारण तपासत आहोत. चालकाविरोधात कारवाई सुरू आहे.”
‘अवजड वाहनांचा विळखा वाढतोय’
हिंजवडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. कंपन्या बंद झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच झालेल्या या अपघातामुळे नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.





