हजारो सोसायटी धारकांच्या उपस्थितीत चिखली मोशी चऱ्होली फेडरेशनचा “सहकार संवाद”
सोसायटी व्यवस्थापनाबाबत जागरुकतेसाठी फेडरेशनचे उपक्रम गौरवनीय; उपस्थितांकडून कौतुक

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांसाठी चिखली मोशी चऱ्होली पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे सहकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील विविध सोसायट्यांमधील तीन हजारांहून अधिक कार्यकारी मंडळ सदस्य तसेच सोसायटी सभासदांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमात सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी फेडरेशनच्या स्थापनेमागील भूमिका आणि गेल्या दहा वर्षांतील कामगिरी याविषयी सविस्तर माहिती दिली. फेडरेशनने सोसायट्यांना आवश्यक पाणीपुरवठ्याची उपलब्धता करून दिली असून सोसायटीधारकांवर लादण्यात आलेले उपयोगकर्ता शुल्क स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने आणि महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून रद्द करून घेतल्याची माहिती सांगळे यांनी दिली. मोशी आणि चऱ्होली परिसरातील लोकवस्तीमध्ये नियोजित असलेली कचरा संकलन व वितरण केंद्रे फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर हटवण्यात आली.
सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1960 आणि 1961 नुसार सोसायटींचे संचलन सुकर होण्यासाठी वेळोवेळी माहितीपर शिबिरे आयोजित करून सदस्यांना जागृत केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पिंपरी चिंचवड शहरातील 500 हून अधिक सोसायट्यांची कन्व्हेन्स डीड पूर्ण करण्यात तसेच 150 पेक्षा जास्त सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हेन्स करण्यात फेडरेशनने मोलाची कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा – चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांच्या साक्षीने अनुराधा साळुंके यांचा प्रचाराचा शुभारंभ !

सोसायटीचे कायदेशीर सल्लागार अॅड अजित बोराडे यांनी सोसायटीचे मेंटेनन्स प्रकार, थकबाकी वसुली, डीम्ड कन्व्हेन्स प्रक्रिया, निवडणूक पद्धती, ऑडिट आणि टॅक्सेशन तसेच सोसायटी व्यवस्थापन समिती आणि सदस्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमाणित लेखापरीक्षक संजय काटे यांनी लेखापरीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाला लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक ज्ञानेश्वर भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विठ्ठल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तानाजी मुंडे, बाबासाहेब पाटील तसेच इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.
सोसायटी व्यवस्थापनातील वाद टाळण्यासाठी, सहकार अधिनियमाची माहिती पोहोचवण्यासाठी आणि आदर्श उपविधींचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सहकार संवाद आयोजित करण्यात आला. संजीवन सांगळे यांनी पुढील काळातही दर महिन्याला अशा प्रकारचे उपयुक्त कार्यक्रम फेडरेशनतर्फे आयोजित केले जातील असे सांगितले.




