शिरूर तालुक्यात भीषण अपघात : आमदार कटके यांच्या ताफ्यातील मर्सिडीज कारची 4 वर्षीय मुलीला धडक

पुणे | शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर–हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या ताफ्यातील मर्सिडीज कारने चार वर्षीय मुलीला जोरदार धडक दिल्याचा आरोप समोर आला आहे. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) ही गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभ्रा रस्ता ओलांडत असताना वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी निघालेली काळ्या रंगाची मर्सिडीज कार (MH 12 1391) अतिवेगाने आली आणि मुलीला जबर धडक दिली. या धडकेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, धक्का इतका तीव्र होता की मुलगी हवेत उडून काही अंतरावर जाऊन रस्त्यावर जोरात आपटल्याचे दिसते.
हेही वाचा : एमआयटी कॉलेजतर्फे मतदान जागरूकता रॅली!
अपघातात मुलीचे दात तुटणे, जबड्याला गंभीर इजा आणि चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. धडक होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मुलीला तातडीने शिरूर येथील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोब पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये हलवले.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र संताप असून, ताफ्यातील वाहनाचा निष्काळजीपणे वेगावरील ताबा ढासळल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.





