वैष्णवी हगवणे प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, सासू, नणंदसह ३ आरोपींचा जामीन फेटाळला

पुणे | हुंडाबळीच्या गंभीर प्रकारामुळे अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात एकूण 11 आरोपींविरुद्ध 1670 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीच्या मित्रासह अशा तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत कठोर निरीक्षणे नोंदवली. कोर्टाने स्पष्ट केले की केवळ नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय इतका टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, कटकारस्थान रचणे आणि पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप आहेत.
हेही वाचा : मराठवाडासह राज्यातील महापूरग्रस्तांसाठी ‘‘एक हात मदतीचा’’
त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास ते पुराव्यात छेडछाड करू शकतात किंवा साथीदारांवर दबाव आणू शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक असून त्यामुळे समाजात विकृत मानसिकता तयार होते असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणात आरोपी असलेला पतीचा मित्र निलेश चव्हाण याच्याबाबत तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तपासानुसार निलेश चव्हाण याने स्वतःच्या पत्नीचाही अनेक वर्षे छळ केला होता. एवढेच नाही तर तो स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून तिच्या अश्लील व्हिडीओंचे शूटिंग करायचा. त्याच्याविरोधात पत्नीने देखील गुन्हा दाखल केला असून इतर काही गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर नोंदींमुळेही आरोपींना जामीन न देण्याचा निर्णय अधिक बळकट झाला.





