जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधान भवन परिसरात काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा – स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी, मिरा-भाईंदर मनपा देशात प्रथम; राज्याला एकूण 10 राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…
मध्यरात्री नेमकं काय घडलं?
विधानभवनाच्या इमारतीमध्ये आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात वाद झाला होता. नितीन देशमुख यांचा शर्ट फाटेपर्यंत मारहाण झाली होती. या प्रकणात विधानभवनाच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यानं वाद वाढला नाही. या घडलेल्या घटनेप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. विधानभवनात देखील आमदार सुरक्षित नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
विधानभवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून पुढील प्रक्रियेसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेलं जात होतं. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या जीपसमोर झोपून त्याला विरोध केला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




