मुंबईचे महापौरपद शिवसेनेला ?
तीनही पक्ष 'महायुती' म्हणून रिंगणात उतरणार : नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये २९ महानगरपालिकांच्या निवडणुका !
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असल्या तरी सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच अन्य २८ महापालिकांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे ‘महायुती’ म्हणूनच लढवणार असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे प्रतिष्ठेचे महापौरपद शिवसेनेकडे देण्याचा डाव टाकण्यावरून चर्चा सुरू आहे.
‘महायुती’ ची तयारी पूर्ण…
या निवडणुकीच्या संदर्भात महायुतीने आपली रणनीती आणि व्यूहरचना आखली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच निर्णय अंतिम असेल, असे सांगण्यात येते.
रवींद्र चव्हाण, प्रताप सरनाईक यांच्या मुलाखती..
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या दोन दिवसात मुलाखती प्रसिद्ध झाल्या असून, त्या आधारे काही तर्क लढवता येत आहेत.
हिंदी बाबत संभ्रम नाही..
एका मुलाखती दरम्यान रवींद्र चव्हाण म्हणाले, की हिंदीबाबतचा संभ्रम कुणात नाही. फक्त राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये हा संभ्रम आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. पण, त्यांनी हा मुद्दा निवडणुकीचा केला असेल तर त्याला काही करू शकत नाही. वाहिन्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. यासाठी समिती स्थापन केली आहे. समिती या संदर्भातील अभ्यास करून अहवाल तयार करणार आहे. विधानसभेत तो पाठवेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महायुती एकत्र लढणार?
चव्हाण म्हणाले, की येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित या निवडणुका लढण्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे ‘महायुती’ नेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम्ही एकत्रच लढणार आहोत असा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा – राऊत-विरुद्ध शिरसाट वाद आता कोर्टात; शिरसाटांनी राऊतांविरोधात ठोकला अब्रू नुकसानीचा दावा
या तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका..
एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, की महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ‘महायुती’ म्हणूनच लढवल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अधिवेशन संपल्यावर प्रत्येक विभागात आम्ही जाणार आहोत. कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या टीमशी संवाद साधणार आहोत. भेटीगाठी होणार आहोत. कार्यकर्ता आणि नेता एकत्र चर्चा करतील. येणाऱ्या काळात महायुतीसाठी चांगले वातावरण करू. सर्व महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढू. मुंबई ठाणे पालिकेच्याही लढू. आम्हाला वातावरण पोषक आहे. त्यामुळे एकत्र लढण्याचे ठरवले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
फडणवीस यांनी ठरवले तर…
मुंबई महानगरपालिकेच्या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ पातळीवर आमची कोअर टीम बसून चर्चा करतील. जागा वाटपाचे सूत्र ठरवतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र बसून जागा वाटपाचे ठरवतील. या नेत्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. तेच जागा वाटपाचे सूत्र ठरवतील, असे सांगतानाच महापौराबाबतचा निर्णय त्यावेळी होईल. देवेंद्रजींनी ठरवले तर महापौरपद एकनाथ शिंदे गटाला देऊ शकतील, असे चव्हाण म्हणाले.
पक्षाचे माझ्यावर अनंत उपकार..
भाजपाचे माझ्यावर उपकार आहेत. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली हे माझे प्रमोशन आहे. प्रत्येकाला वाटते मी मंडलाचा अध्यक्ष व्हावा, तालुक्याचा, जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावा. मी प्रदेशाध्यक्ष झालो. एवढ्या मोठ्या पदावर कार्यकर्त्याने जाणे हा माझा सन्मान आहे. उपाध्यक्ष म्हणून मी युवा मोर्चा चे काम केले आहे. एवढ्या मोठ्या पदासाठी पार्टीने माझा विचार केला हे माझ्यावर उपकार केले असेच म्हणेन, असे त्यांनी सांगितले. एखाद्या सामान्य घरातील पदावरील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर घेऊन जाणे हे इतर पक्षात होत नाही. बाकीच्या ठिकाणी परिवारवाद आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई महापौरपदाचा नवा फॉर्म्युला : सरनाईक
दरम्यान, शिवसेनेचे जेष्ठ नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एक महत्त्वाची मुलाखत दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. यात मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर आता शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी एक नवा फॉर्म्युला मांडला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘महायुती’ त महापौरपदाचे वाटप कसे होईल, याची सूत्रे ठरलेली आहेत. ते म्हणाले, हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता, तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
महायुतीत पदवाटपाचे सूत्र काय ?
प्रताप सरनाईक यांनी ‘महायुती’ तील पदवाटपाची पद्धत स्पष्ट केली. त्यांच्या मते, आगामी निवडणुका ‘महायुती’ म्हणूनच लढवल्या जातील. ज्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेत पूर्वीपासून होती, पूर्वीपासून ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक महापालिकेत निवडून येत होते, त्या पक्षाचा महापौर, असा नवीन फॉर्म्युला असेल.
दुसऱ्या क्रमांकाकडे उपमहापौरपद
द्वितीय स्थानावर ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला उपमहापौरपद तसेच तृतीय स्थानावर असलेल्या पक्षाला स्थायी समितीचे अध्यक्षपद, अशा प्रकारचे महायुतीत वाटप केले जाते,” अशी माहिती त्यांनी दिली.
अंतिम निर्णय शीर्षस्थ नेत्यांचाच!
या सर्व चर्चा आणि फॉर्म्युल्यांवर बोलताना सरनाईक यांनी हे देखील स्पष्ट केले की, “आम्ही किती, काहीही बोललो तरीही अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीचे चोखपणे पालन करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून वावरताना कार्यपद्धती योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले.





