Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

“तुम्हाला अजितदादांनी संधी दिली हे विसरु नका… ” : राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील

राजकारण: भाजपा आमदार महेश लांडगे यांना खणखणीत प्रतिवाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आखाड्यात सध्या तापलेलं वातावरण अधिकच चिघळत चाललं असून, भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील अप्रत्यक्ष संघर्षाने आता अधिक तीव्र व खुले रूप धारण केलं आहे. “तुम्हाला अजितदादांनी संधी दिली हे विसरु नका… ” असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी “मी पैलवान आहे, कोणालाही घाबरत नाही,” अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच कुस्तीचं आव्हान दिलं. या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी या विधानाचा जाहीर समाचार घेत सडकून प्रतिउत्तर दिलं आहे.

उमेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत लांडगे यांना उद्देशून जोरदार प्रतिकिया दिली. त्यांनी म्हटले – “तुमचा वस्ताद अजितदादा आहे. आणि त्यांनीचं तुम्हाला लंगोट घालायला शिकवलं, तेंव्हा कुठं तुम्ही पैलवान झाला हे विसरु नका..! वस्ताद शेवटी एक डाव राखून ठेवतो, हे लक्षात ठेवा.”

हेही वाचा –  इम्तियाज जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाठांनी केला अब्रूनुकसानीचा दावा, चारित्र्य हानन करुन बदनामीचा आरोप

या विधानाने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, भाजप आणि राष्ट्रवादीमधील सत्तासंघर्ष अधिक उघड होऊ लागला आहे. यापूर्वी अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवत कठोर भाष्य केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर “मी अंगावर घेण्यास तयार आहे” अशी भाषा वापरली, ज्यावर खुद्द फडणवीसांनी “ये पब्लिक है, सब जानती है” असा सल्ल्याचा टोन वापरला होता.

वस्ताद शेवटी कोण ठरेल, हे मात्र मतदारच ठरवतील : उमेश पाटील

“तुम्हाला पैलवान बनवलं ते कोण?” असा थेट सवाल करत उमेश पाटील यांनी महेश लांडगे यांची राजकीय जडणघडण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झाली, हे सहजपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि महायुतीतील अंतर्गत घुसमट या दोन्ही मुद्द्यांवर गंभीर चर्चा रंगू लागली आहे. लवकरच या संघर्षाचे प्रतिबिंब निवडणूक रिंगणातही दिसून येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.राजकीय कुस्तीच्या आखाड्यात सध्या दोन्ही बाजूंनी डाव-पेच टाकले जात आहेत. मात्र वस्ताद शेवटी कोण ठरेल, हे मात्र मतदारच ठरवतील, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button