‘मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही’; RSSच्या भैय्याजी जोशी यांच वक्तव्य

मुंबई | मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. तसेच, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भैयाजी जोशी म्हणाले, की मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.
हेही वाचा : राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
दरम्यान, भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील भाजाप्रणित सत्ताधाऱ्यांना, एकनाथ शिंदे यांना भय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य मान्य आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मुंबईची भाषा मराठीच आहे. सत्ताधाऱ्यांनी जोशींच्या वक्तव्यावरील त्यांची भूमिका जाहीर करावी, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.





