‘महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले’; जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य
Mahakumbh 2025 | प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला मागच्या आठवड्यातल्या बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. ‘मौनी अमावास्ये’साठी संगमावर प्रचंड गर्दी झालेली असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेबाबत आता समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
खासदार जया बच्चन म्हणाल्या, की महाकुंभमेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदुषित झालं. आजही विचाराल की सर्वाधिक दुषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही. कुंभमेळ्यात जे काही घडलं त्याबद्दल कुणीही काहीही सफाई देत नाही. मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने ते पाणी दुषित झालं आहे. आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि उत्तरही तेच लोक देत आहेत. गरीब आणि कमजोर लोक यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत नाही. व्हिआयपी लोकांनाच ती ट्रिटमेंट मिळते. सामान्य लोकांसाठी काहीही व्यवस्था नाही. प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक आले हे तर धडधडीत खोटं आहे. इतके लोक येतीलच कसे जरा विचार करा.
हेही वाचा : ‘वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्यासमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दुषित झालं आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसंच पोहचतं आहे. तसंच लोकांचं लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊ दिलं नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. आता याच भाजपा जलशक्तीवर भाषणं देत आहेत, असंही जया बच्चन म्हणाल्या.