‘नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा’; अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Anjali Damania | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत असतानाच आता त्यांच्यावर कृषीमंत्री असताना झालेल्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंवर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, की नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय, असं म्हणत अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली अन् हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारले. हे उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या.
हेही वाचा : ‘महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले’; जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य
नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये एक लिटर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरची बॉटल ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच : अंजली दमानिया
मी ऑनलाइन उपलब्ध असलेले दर सांगतेय. हे दर रिटेलचे आहेत. पण ही उत्पादने बल्कने घेतली तर २० टक्के अधिक आहेत. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का? त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच, असं अंजली दमानिया म्हणाल्या.