Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव’; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात विश्व मराठी संमेलन २०२५’ चे स्वरूप स्पष्ट करण्याकरिता पत्रकार परिषद

पुणे : आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत विश्व मराठी संमेलन २०२५ चे स्वरूप आणि त्यातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव’, असे म्हणत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.

हे भव्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘अभिजात मराठी’ असून, यामध्ये मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरांचा जागर केला जाणार आहे. यावेळी संमेलनाची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरापासून भव्य शोभायात्रेने होणार आहे. सदर संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते व दोन्ही मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होईल.

याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “पुण्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, तेव्हा त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असल्याची ग्वाही दिली होती आणि त्याची लगेचच पूर्तता देखील केली. मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले संमेलन आहे. त्यामुळे या संमेलनाला विशेष महत्त्व आहे. या संमेलनात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर आपली छाप पडणाऱ्या रितेश देशमुख यांचा कलारत्न पुरस्काराने विशेष सन्मान केला जाणार आहे. या संमेलनात साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, खाद्य संस्कृती याचा मिलाप असणार आहे.”

हेही वाचा –  BJP संघटन पर्व: ‘एक कोटी सदस्य नोंदणी’; मुंबईत भाजपची कार्यशाळा

याबाबत पुढे बोलताना डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून १७ देशांचे मराठी भाषिक प्रतिनिधी आणि बृहन महाराष्ट्र मंडळे यांचे मिळून सुमारे २०० मराठी भाषा व संस्कृती यावर प्रेम करणारे लोक या संमेलनासाठी परदेशातून उपस्थित राहतील.

या संमेलनामध्ये जुनी पुस्तके देऊन त्या बदल्यात नवीन पुस्तके घेऊन जा अशी भन्नाट संकल्पना असणार आहे. कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, मराठीचा जल्लोष करणारा मराठमोळा कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, मराठीमधून वाणिज्य, तंत्र, व्यवस्थापन शिक्षण मुलांनी आवर्जून घ्यावे यासाठी विविध उपक्रम देखील असणार आहेत. त्याचबरोबर मराठी मुलांनी नोकऱ्यांपेक्षा उद्योग/व्यापारामध्ये करिअर करावे यासाठी विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.”

तसेच, विश्व मराठी संमेलन २०२५ मध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सहभाग असलेले विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या परिसंवादांमध्ये मुख्यतः महिला कायदा व महिलांना न्याय, मराठी भाषा आणि स्त्री साहित्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

यावेळी, पत्रकार परिषदेला मराठी भाषा विभागाचे संचालक शशिकांत देवरे, मराठी विश्व संमेलनाच्या समन्वय समितीचे सदस्य डॉ. दीपक मराठे, प्राध्यापक चारुदत्त निमकर, पुणे शहर सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना संपर्कप्रमुख लातूर जिल्हा रंजना कुलकर्णी, पुणे शहर प्रमुख सुरेखा कदम-पाटील उपस्थित होत्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button